नागपूर व पुणे येथील नदी पुनरूज्जीवनास मंजूरी

नागपूर व पुणे येथील नदी पुनरूज्जीवन योजनेअंतर्गत

कामांसाइी 1 हजार कोटींच्या निविदांना मंजुरी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली  : नागपूर येथील नाग नदी आणि पुणे येथील मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन योजनेतंर्गत विकासकामांसाठी 1 हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.    

           गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि समस्या यासंदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा मंत्री  जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार  सर्वश्री गिरीष बापट, डॉ. सुभाष भामरे, सुनिल मेंढे आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 पुण्यातील मुळा-मुठा नदी आणि नागपुरातील नागनदीच्या पुनरूज्जीवन योजनेतंर्गत विविध कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या योजनेंतर्गत करावयाच्या विविध विकासकामांसाठी जपानच्या जायका कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी विकासकामांसाठी 1200 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तर नागनदी विकासकामांसाठी 1700 कोटी रूपये खर्च येणार आहे. यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री  शेखावत यांच्याकडून नागनदी पुनरूज्जीवन योजनेसाठी आखलेल्या समितीमध्ये पर्यावरण विषयक तज्ज्ञ नेमण्याच्या सूचना करण्यात आल्‍याचेही गडकरी यांनी सांगितले.

केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

         पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजना  केंद्र शासन पुरस्कृत सिंचन योजनांतर्गत राज्यातील विविध सिंचन प्रकल्प  पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल, कोविड महासाथीमुळे या प्रकल्पातील कामांची गती मंदावली होती तसेच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयासंदर्भात आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन मिळाले. या राष्ट्रीय प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून या कामांना गती देण्याबाबत बैठकीत एकवाक्यता झाली, असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

          यासह पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत येणारे 26 प्रकल्प  आणि बळीराजा जल संजीवनी योजनेअंतर्गत येणाऱ्या 91 प्रकल्पांना केंद्राकडून अर्थसहाय्य केले जाते. या योजनांमधील प्रकल्पांची कामे अंतीम टप्प्यात असून एकूणच प्रकल्प येत्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले जातील. याशिवाय ज्या प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत अशा प्रकल्पांविषयी राज्यपालांशी चर्चा करून प्रकल्पांना गती देण्याचे काम केले जाईल,  असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

          राज्यातील जीगाव, सुलवाडे आदी मोठया जलसिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा मिळावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली, यासह नदीजोड प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली, असल्याचे  पाटील यांनी सांगितले.

दिगंबर वाघ             

      कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


       🙏  एक वचन तीन नियम  🙏

  १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा