कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग , मास्कची कारवाई अधिक तीव्र करणेबाबत सुचना दिल्या असून उदयापासून काही निर्बंध लागू करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

       दुकाने सकाळी 7.00 ते सायं. 7.00 या कालावधित सुरु राहतील.( अत्यावश्यक सेवा सोडून), शनिवार, रविवार पी 1, पी 2 प्रमाणे दुकाने उघडी राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वडापावच्या गाडया, चायनिजच्या गाडया येथे लोक नियमांचे उल्‍लंघन करतात. त्यांना यापुढे सायं. 7.00  वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. भाजी मंडई देखील 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. लग्न, हळदी समारंभ यावर कडक निर्बंध घालण्यात येत असून शासनाच्या नियमांचे उल्‍लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. बार, रेस्टॉरंट आता रात्री 11.00 वाजेपर्यंतच उघडी राहतील, आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याचेवरही कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

 कोविडचा लढा पुनश्च चालू झाला आहे, तरी या लढयात सगळयांनी सहकार्य करावे! - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी 

              कोविडचा लढा पुनश्च चालू झाला आहे, तरी या लढयात सगळयांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आय.एम.ए., निमा, केम्पा आणि होमिओपॅथिक असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर आज संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. दि.13 मार्च 2020 रोजी कोविड उपाययोजनांबाबत प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती. गेले काही दिवसांपासून कोविडची रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत रुपरेषा ठरविण्यासाठी आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत कोविड साथीच्या वाढणा-या संख्येबाबत सखोल चर्चा करण्यात येवून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे रुग्णालयांना गाईडलाईन ठरवून देण्याचे सांगण्यात आले. कोविड टेस्टिंग वाढविण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित फिजीशियन यांनी व्यक्त केल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहमती दर्शविली.

          कोविड रूग्णांचे निदान त्वरीत होण्यासाठी तापाचे दवाखाने पुन्हा पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करणेबाबतच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोविडची लक्षणे असलेला रुग्ण गंभिर आजारी झाल्यास आणि सदर रुग्णाची कोविड टेस्ट केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टरवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे एखादया रुग्णाच्या सिटी स्कॅनमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास परंतू सदर रुग्णास त्रास होत नसेल तरीही त्यास संशयित रुग्ण म्हणून सावळाराम कोविड सेंटरमध्ये दाखल करावे अशा सुचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त,कडोंमपा सुनिल पवार, पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे, सहा. आयुक्त अनिल पोवार, महापालिका वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी सुहासिनी बडेकर साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सरवणकर‍ उपस्थित होते.

दिगंबर वाघ             

     कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा