ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे
दर आठवडयाला, दर सोमवारी...
सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण आणि अधिमंडळ यांची मासिक सभा. सर्वसाधारणपणे नावातून आपण अंदाज घेऊ शकतो को, वार्षिक (वर्षातून एकदा), अधिमंडळ सभा मासिक (महिन्यातून एकदा) परंतु विशेष सर्वसाधारण सभा कधी, कोण, कशाप्रकारे आणि कशासाठी बोलावण्यात येते? याबाबतची माहिती सदर लेखातून आपणास मिळणार आहे.
प्रश्न क्र. १०१) संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा केव्हा आयोजित करावी लागते ?
उत्तर: अत्यंत महत्वाच्या, तातडीच्या कामकाजासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते. उदा. कार्यकारिणीच्या कार्यकक्षेबाहेरील खर्चिक धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे असल्यास किंवा न्यायालयाकडून विहित मुदतीत निर्णय धेण्याचे आदेश संस्थेला दिले असल्यास किंवा उप-निबंधक यांचे आदेशानुसार त्यांनी कळविलेल्या विषयासंदर्भात सभेचे आयोजन करायचे असल्यास किंवा सर्वसाधारण सभेपुढे चर्चेसाठी विषय आवश्यक आहे परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी फार लांब असल्यास तसेच विषय सदस्यांच्या हिताला बाधा आणणारा असेल अशावेळी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते.
प्रश्न क्र. १०२) संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा कोण बोलावू शकतो? कोणतेही सर्वसाधारण विषय चर्चेसाठी घेता येतात का ?
उत्तर: अध्यक्षांच्या परवानगीने किंवा समिती सदस्यांच्या मताधिक्याने संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा केव्हाही बोलविता येईल. तसेच संस्थेच्या किमान एक पंचमांश सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेले लेखी मागणी पत्र किंवा ती संस्था ज्या जिल्हा सहकारी महासंघास संलग्न आहे, त्या जिल्हा महासंघाकडून तशी सूचना मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत बोलाविली पाहिजे. अशा प्रकारे बोलाविण्यात आलेल्या सभेमध्ये मागणी करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करण्यासाठी काढण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आलेल्या विषयांव्यतिरिक्त कोणताही विषय चर्चेस घेण्यात येत नाही.
प्रश्न क्र. १०३) संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी किती दिवसांची नोटीस सदस्यांना दयावी लागते ?
उत्तर: ५ पूर्ण दिवसांची नोटीस संस्थेच्या सर्व सदस्यांना दयावी लागते. सदर नोटिशीची प्रत नोंदणी प्राधिकाऱ्याकडे आणि गृहनिर्माण संघाकडे पाठविली पाहिजे. एखाद्या निकडीच्या प्रसंगी समितीने कमी मुदतीची नोटीस देऊन विशेष सर्वसाधारण सभा भरविण्याचा एक मताने निर्णय घेतल्यास त्याप्रमाणे कमी मुदतीची नोटीस देऊनही विशेष सर्वसाधारण सभा बोलविता येईल. एखाद्या निकडीच्या प्रसंगी बोलाविण्यात आलेल्या अशा बैठकीची विषयपत्रिका आणि बैठकीचे कारण सर्व सदस्यांपर्यंत लेखी स्वरूपात पोहोचले पाहिजे. त्याचप्रमाणे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय अशी बैठक झाल्यापासून दोन दिवसांच्या मुदतीमध्ये सर्व सदस्यांना लेखी स्वरूपात कळविले पाहिजेत.
प्रश्न क्र. १०४) सर्वसाधारण सभेसाठी गणपूर्ती किती असणे आवश्यक असते ?
उत्तर: संस्थेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेला एकूण सदस्य संख्येच्या २/३ सदस्य किंवा २० सदस्य या दोन्हीपैकी जी संख्या कमी असेल तितके सभासद हजर राहिल्यास गणपूर्तीसाठी आवश्यक असतात.
प्रश्न क्र. १०५) मूळ सभासद ज्येष्ठ नागरिक असल्यास किंवा वार्धक्य / अपंगत्व / आजारपण यामुळे सह्सभासदा समवेत उपस्थित राहू शकतो का ?
उत्तर: होय. मूळ सभासद ज्येष्ठ नागरिक असल्यास किंवा वार्धक्य / अपंगत्व / आजारपण यामुळे सह्सभासदा समवेत उपस्थित राहू शकतो. परंतु मतदानाच्या वेळी मूळ सभासदालाच मतदानाचा अधिकार राहील. सह्सभासदाने मूळ सदस्यासोबत भागधारक असणे बंधनकारक आहे.
मागील लेखाबाबत माहिती अथवा सशुल्क मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच सदर लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रीया
vishal@vlawsolutions.com
वर नक्की पाठवा.