वालधुनी नदीवरील पुलासह लेव्हल क्राॅसिंगचे लोकार्पण

मनपा क्षेत्रातील मोहना टिटवाळा अटाळी बल्याणी वाहतूक विना अडथळा

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : एकनाथजी शिंदे (मा.मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, ठाणे जिल्हा)  यांचे शुभहस्ते कल्याण (प) भागातील मुरबाड रोडवरील वालधुनी नदीवरील नवीन पूल आणि शहाड आंबिवली स्थानकादरम्यान लेव्हर क्रॉसिंग गेट क्र. ४७ ब च्या ठिकाणी बांधण्यात आलेला उड्डाण पूल या 2 पुलांचे  आज लोकार्पण  करण्यात आले.

          कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील मोहना, टिटवाळा व परिसरास कल्याणला जोडणाऱ्या मोहने रोडवरील वडवली येथील रेल्वे फाटक क.४७ ब मुळे वाहतुकीस होणारा विलंब विचारात घेऊन त्या ठिकाणी नवीन उड्डाण पूल बांधण्‍याचे काम क.डों.म.पा व मध्य रेल्वे यांच्यात संयुक्तपणे खर्च विभागणी तत्वावर हाती घेण्यात आले. यातील रेल्वे मार्गावरील काम मध्य रेल्वेमार्फत व पोहोच रस्त्याचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

        महापालिका क्षेत्रामधील मोहना, टिटवाळा, अटाळी, बल्याणी व परिसरातील वाढत्या लोकवस्तीमुळे मोहना रोडवरील वाहतुक मोठया प्रमाणात वाढली असून उड्डाणपूलामुळे वाहतुक विना अडथळा व जलद होण्यास मदत होईल.रेल्वे फाटक बंद झाल्याने रेल्वे  विभागाचा रेल्वे मार्गातील अडथळा दूर होणार आहे.

        कल्याण मुरबाड रोड हा राष्ट्रीय महामार्ग क. ६१ (जुना क.२२२) च्या मार्गावर येत असून या रस्त्यावर भवानी चौकाजवळील वालधुनी नदीवरील जुन्या अरुंद पुलामुळे सतत वाहतुक कोंडीचा त्रास होत होता. यामुळे या ठिकाणी नविन व रुंद पुलाची आवश्यकता होती. आता या नविन पुलामुळे दाट वाहतुकीच्या राष्ट्रीय महामार्ग क. ६१ वरील तसेच शहाड, मोहना, टिटवाळा व परिसरातील वाहनांची वाहतुक सुलभ होण्यास मदत होणार आहे .या लोकार्पण समयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, माजी महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आणि अन्य अधिकारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८