परवानाधारक रिक्षाचालकांनी अनुदानासाठी अर्ज करावेत
सानुग्रह अनुदानासाठी 2 लाख 65 हजार रिक्षाचालकांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे आवाहन
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून ती दि. 22 मे 2021 पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता खुली करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 465 रिक्षाचालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापेकी 71 हजार 40 रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 1 लाख 5 हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळविण्यात आले आहे, असे परिवहन मंत्री परब यांनी सांगितले. या प्रणालीची माहिती विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याकरीता परवानाधारक रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असुन, तो ज्या बँक खात्याशी जोडणी केलेला आहे त्या खात्यामध्ये रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येत आहे.रिक्षा परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरिता व मोबाईल क्रमांकाचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्याकरिता परिवहन कार्यालयांमध्ये सुध्दा आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे.
ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज दैनंदिनरित्या निकाली काढण्याकरिता राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांमध्ये कर्मचारी / अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नागरी संपर्क केंद्रावरील कर्मचाऱ्यांना योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 18001208040 या टोल फ्री नंबरवर आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे आणि आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा असे आवाहन परिवहन मंत्री परब यांनी केले आहे.