शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा - कृषीमंत्री दादाजी भुसे
राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांची दर्जावाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, उपकरणांची आवश्यकता याबाबतचा प्रकल्प अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी सांगितले.राज्यात पुणे, परभणी, नागपूर येथे बीज परिक्षण प्रयोगशाळा असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर अशा पाच ठिकाणी खत नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. तर पुणे, ठाणे, औरंगाबाद, अमरावती या चार ठिकाणी कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा आहेत. जैविक कीडनाशके व जैविक खते प्रयोगशाळा अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा अशा 10 ठिकाणी आहेत. तर कीडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा पुणे आणि नागपूर येथे आहे. या सर्व प्रयोगशाळांच्या माध्यमातून 2020-21 मध्ये सुमारे 6 कोटी 25 लाख 39 हजार एवढा महसूल जमा झाला आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शेतकऱ्यांची यशकथा प्रसिद्ध करावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.