महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून राज्यभर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, असेही थोरात यांनी सांगितले. ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे.
शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.