रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती !

महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पातील 600 मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी महत्वकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडवली नदी पासून  अटाळी पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित राहीले होते. बुधवार, 11 ऑगस्ट रोजी  नदीचा ब्रीज ते अटाळी हद्दीपर्यंत 600 मीटर  रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणारी झाडे वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीनुसार महापालिकेच्या विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, एमएमआरडीएचे अधिकारी, अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत,  महापालिकेचे पोलिस कर्मचारी व खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत तोडण्याचे काम हाती घेण्यात येऊन लगेचच रस्त्यालगतच्या गटारीचे कामकाजास प्रारंभ करण्यात आला. रिंगरुट प्रकल्पात बाधीत झालेली झाडे तोडण्यापूर्वी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे उद्देशाने आंबिवली टेकडी येथे सुमारे 15 हजार झाडे लावण्यात आलेली आहेत आणि आज तिथे घनदाट जंगल उभे रहात आहे. रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणा-या झाडांपैकी ताडांच्या झाडासाठी प्रती झाड रुपये 10 हजार मोबदला मा.महासभेच्या ठरावानुसार यापूर्वी तोडण्यात आलेल्या ताडांचे बदल्यात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. यापुढे ही तोडलेल्या झाडांपैकी ताडांच्या झाडांसाठी प्रती झाड रु.10 हजार मोबदला संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या दिला जाईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८