परवाना नोंदणी तपासण्याची विशेष मोहीम घेण्यात आली आहे.

अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

मुंबई प्रतिनिधी : अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवाना, नोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की, अन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक असून ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा  कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून, त्यामध्ये पाच लाखापर्यंत द्रव्य दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने दिल्या आहेत.

 परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८