कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा मला अभिमान आहे !

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा मला अभिमान आहे -उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कला मंदिरात विविध उपक्रमाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळयासमयी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले. कोविडच्या लाटेत सर्व जग ठप्प झाले आहे, असे वाटत असतांना महापालिका प्रशासनाने अनेक लोकोपयोगी कामे पूर्ण केली. महापालिकेला सर्वोच्च असे कोविड इनोव्हेशन ॲवार्ड प्राप्त झाले आहे, त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करून त्यांनी महापालिकेच्या लोकाभिमुख  कामांचे  कौतुक केले. ठाण्यातील घटना पाहता काही ठिकाणी कठोरतेने कायदे राबविणे आवश्यक असून, फेरीवाल्यांचा उच्छाद असेल तर तो आटोक्यात आणला पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. कोविडची तिसरी लाट येऊ नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोपर ब्रीजला नविन पॅरलल ब्रीज बनविण्यासाठी निधी एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून देऊ त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उर्वरित कामे मार्गी लागतील याची ग्वाही घेत आहे, असे आश्वासक उद्गार पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या भाषणात काढले.

     आवश्यक पायाभूत सुविधांचे लोकार्पण होणे ही महापालिकेच्या नागरिकांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कोविड कालावधीत कर्मचारी-अधिकारी यांनी सर्व संकटावर मात करुन कोविड लढयाला यशस्वी तोंड दिलं. कोविड कालावधीत जनतेसाठी केलेल्या कामाचे फलीत म्हणजेच महापालिकेला मिळालेले  कोविड इनोव्हेशन ॲवार्ड होय, याचे सर्व श्रेय लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी ,कर्मचारी ,सर्व वैदयकीय व इतर संघंटना आणि नागरीक यांचे आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात काढले. या लोकार्पण सोहळया समयी कपिल पाटील-केंद्रीय राज्यमंत्री, पंचायती राज, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली. सदर कार्यक्रमात कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केल्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांस पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल, ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात उभारण्यात आलेला प्राणवायू निर्मिती प्रकल्प, तसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उभारण्यात आलेला प्राणवायू निर्मिती प्रकल्प, बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर रुग्णालय येथे उभारण्यात आलेले अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, आय वार्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, जैवविविधता उदयान-आंबिवली, तेजस्विनी बस व कल्याण-डोंबिवली शहर दर्शन बस तसेच टिटवाळा अग्निशमन केंद्र,मांडा या विविध उपक्रमांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचे शुभहस्ते ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८