राजभवन येथे पहिले 'कलाकार व लेखकांचे निवासी शिबिर'संपन्न

कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते’ - राज्यपाल

मुंबई विद्यापीठात 'नृत्य विभाग सुरु करणार - डॉ. पेडणेकर 

राजभवन येथे क्रांतिकारकांचे दालन सुरु करण्यासाठी सहकार्य करणार - डॉ. विक्रम संपत

मुंबई प्रतिनिधी : मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम कृती असून मनुष्यमात्रांमध्ये देखील कलाकार व लेखक नवसृजनाचे दैवी कार्य करीत असतात. हे नवसृजन समाजाला समृद्ध करीत असते. साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच म्हणावी लागेल, असा संदर्भ देताना साहित्य, संगीत व कलेचा उपयोग उन्नत समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आयोजित पहिल्या एक आठवड्याच्या कलाकार व लेखकांच्या निवासी शिबिराची शनिवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते.

    शिबिराची संकल्पना व नियोजन इतिहासकार व लेखक विक्रम संपत यांनी केले होते.शिबिर समारोप कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, शिबिरात सहभागी झालेले डॉ विक्रम संपत, रहस्यकथा लेखिका मंजिरी प्रभू, बंगलोर येथील नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज व दिल्ली येथील सृजनात्मक लेखक व संपादकीय चित्रण कलाकार रणक सिंह मान प्रामुख्याने उपस्थित होते.राजभवन येथे कलाकार व लेखकांची कार्यशाळा आयोजित करून आपण त्यांना उपकृत केले नाही तर त्यांनी आपल्या राजभवनातील वास्तव्याने आपणांस गौरवान्वित केले, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. संगीत व साहित्य यांना भौगोलिक सीमांचे बंधन नसून ते मनुष्याला दुःख विसरायला लावते, असे उद्‌गार राज्यपालांनी यावेळी काढले.

मुंबई विद्यापीठात 'नृत्य विभाग सुरु करणार : डॉ पेडणेकर

    मुंबई विद्यापीठात ललित कला, लोककला व संगीत विभाग आहे; मात्र नृत्य विभाग नाही, याबाबत नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज यांनी केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन लवकरच विद्यापीठात नृत्य विभाग सुरु करण्याबद्दल आपण पावले उचलणार असल्याचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी यावेळी आश्वस्त केले.

राजभवन येथे राज्यातील क्रांतिकारकांचे दालन सुरु करण्यासाठी सहकार्य करणार : डॉ विक्रम संपत

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजभवन येथील भूमिगत बंकरमध्ये महाराष्ट्रातील विविध क्रांतिकारकांचे प्रेरणादायी दालन स्थापन करावे. या कार्यात शिबिरात सहभागी झालेले सर्व कलाकार व लेखक सहकार्य करतील, असे आश्वासन डॉ विक्रम संपत यांनी सांगितले.राजभवनातील या दालनामध्ये वासुदेव बळवंत फडके, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, चाफेकर बंधू, गणेश वैशंपायन, व्ही.बी. गोगटे, यांसह इतर क्रांतिकारकांचा समावेश असावा, तसेच सन १९४६ साली मुंबई येथे रॉयल नेव्ही विरुद्ध झालेल्या नौदलाच्या सशस्त्र लढ्याचा इतिहास नमूद केला जावा, असेही त्यांनी सांगितले.विविध क्षेत्रातील लोकांकरिता राजभवन खुले करून राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवनाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण केले असे डॉ विक्रम संपत यांनी यावेळी सांगितले.

मुंबई विद्यापीठाला संगीत ठेवा भेट

देशाच्या कानाकोपऱ्यातून महत्प्रयासाने पंधरा हजार जुन्या ग्रामोफोन रेकॉर्डस् जमवून आपण भारतीय संगीताचे देशातील पहिले ऑनलाईन आर्काइव्ह तयार केले असून त्याची डिजिटल आवृत्ती मुंबई विद्यापीठाला भेट देत असल्याचे डॉ विक्रम संपत यांनी यावेळी जाहीर केले. डिजिटल आर्काइव्ह संगित क्षेत्रातील संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.लेखिका मंजिरी प्रभू यांनी राजभवनावर आधारित रहस्य - गूढकथा लिहिण्याचे प्रस्तावित केले, तर रणक सिंह मान यांनी राजभवनाला डिझाईन व डिजिटल उपक्रमाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी नृत्यांगना मधू नटराज यांनी नृत्याच्या माध्यमातून सरस्वती वंदना सादर केली तर मुंबई विद्यापीठाच्या आजी - माजी विद्यार्थ्यांच्या चमूने सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.

    राजभवन येथील शिबिराचे काळात कलाकार व लेखकांनी कला क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या भेटी घेतल्या तसेच सर जे जे कला महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाच्या संगीत, नाट्य व लोककला विभागाला तसेच एशियाटिक सोसायटीला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८