साधारण ५० स्टार्टअप्स ७० हून अधिक गुंतवणूकदारांचा सहभाग

रुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणा-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

स्टार्टअप प्रदर्शनातून तरुणांमधील संशोधन नवसंकल्पनांना मिळाली चालना
मुंबई प्रतिनिधी :  नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo - VC Mixer) हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधन नवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.  हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन सिकोया कॅपिटल इंडियाच्या मुख्य सार्वजनिक धोरण अधिकारी श्वेता राजपाल-कोहली आदी मान्यवर उपस्थित होते.
Startup Expo - VC Mixer च्या माध्यमातून स्टार्टअप्स व गुंतवणूकदार यांना एकमेकांशी जोडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताहातील पन्नासहून अधिक विजेत्या स्टार्टअप्सना संभाव्य निधी उभारणीसाठी आघाडीच्या स्टार्टअप गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी आजच्या या प्रदर्शनातून मिळाली. यामध्ये Blume Ventures, Avanaa Capital, Sequoia Capital India, Equanimity, IvyCap Venture Advisors, १००X, Indian Angel Network, Tomorrow Capital, Mumbai Angels, Asha Impact, Ankur Capital, Venture Catalysts, Artha Ventures, Ah! Ventures, Lead Angels, Marico Innovation Foundation, IDBI Capital, Majority Fund, Social Alpha यांसारख्या नावाजलेल्या स्टार्टअप गुंतवणूकदारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.कौशल्य विकास मंत्री मालिक यावेळी म्हणाले, स्टार्टअप्सला प्रोत्साहनासाठी विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना १५ लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी Startup Expo – VC Mixer हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे  मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या आज जागतिक स्तरावरही आपल्या यशाची पताका झळकवत आहेत. राज्य शासन आणि स्टार्टअप परिसंस्थेतील भागधारक  यांच्या संयुक्त भागीदारीने पारंपरिक तसेच नवीन काळातील क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी सिकोया इंडियाचा “सर्ज” उपक्रम व त्याची मार्गदर्शक पुस्तिका अतिशय उत्तम आहे. सर्वसमावेश पाठबळामुळे महाराष्ट्रातून येत्या काळात जास्तीत यशस्वी स्टार्टअप्स निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह म्हणाले,  महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोजिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी १५ लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात.  यामध्ये कृषी, आरोग्य सेवा, स्वच्छ ऊर्जा, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, प्रशासन, शिक्षण आणि कौशल्य या क्षेत्रांचा समावेश आहे. या वार्षिक उपक्रमाच्या आजवर चार आवृत्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सचे काम विविध विभागांसोबत चालू आहे. आज आयोजित प्रदर्शनातून या स्टार्टअप्सना नामांकीत गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली असून यातून तरुणांमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिकोया कॅपिटल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी “Surge - Founder Starter Pack” या मराठीतील  पुस्तिकेचे प्रकाशन झाले. पुस्तिकेतील स्टार्टअप यशस्वीतेची मूलभूत तत्वे महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योजकांना उपयोगी ठरणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती www.surgeahead.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

    

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८