कृषि यंत्रांच्या चाचणी अहवालासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश - कृषिमंत्री दादाजी भुसे
एखाद्या कृषि औजाराची 35 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्यास त्या यंत्रांची केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थांकडून चाचणी करुन प्रमाणित करुन घेण्याच्या मार्गदर्शिका केंद्राने दिलेल्या आहेत. या अधिसूचित संस्थांमध्ये महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचा समावेश आहे. कृषि विभागाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना यांत्रिक औजारे पुरविल्यानंतर या यंत्रांची चाचणी करुन घ्यावी लागते मात्र ट्रॅक्टर ट्रेलर या यंत्रासाठी चाचणीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. यंत्रे प्रमाणित करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांकडून ते प्रमाणित करून घ्यावे आणि कमी रकमेत सध्याच्या केंद्रांमध्ये व्यवस्था उभी करुन यंत्रसामुग्री प्रमाणित करुन घेण्याच्या सूचनाही कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या. कृषि यंत्रांच्या चाचणी आणि प्रमाणिकरणासाठी निवडलेल्या केंद्रांमध्ये कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासन दीड कोटी रुपयांचे अनुदान देते, त्यामुळे या सुविधा उभारणीसाठी संबंधित विद्यापीठांनी शासनाकडे पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले. ट्रॅक्टर ट्रेलरबरोबरच कांदा पेरणी यंत्र, स्लरी यंत्र याशिवाय शेतकऱ्यांच्या सूचना मागवून त्यांच्याकडून प्राप्त यंत्रांचा समावेश या प्रस्तावात करण्याच्या सूचनाही कृषि विभागाच्या समितीला यावेळी कृषिमंत्र्यांनी दिल्या. यंत्रांची चाचणी आणि प्रमाणित करण्याअभावी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कृषि विभागाने तातडीची पावले उचलून कार्यवाही करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.
कृषि विद्यापीठांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन दालन सुरु करण्याच्या सूचना
कृषि क्षेत्रात नित्य नवे प्रयोग होत असून शेतीसाठी शेतकऱ्यांनी कल्पकतेतून तयार केलेल्या यंत्रांची माहिती इतर शेतकऱ्यांना व्हावी यासाठी अशा सर्व यंत्रसामुग्रीचे कृषि विद्यापीठांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन भरवण्याच्या सूचना कृषिमंत्री भुसे यांनी दिल्या.