नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी अतिदुर्गम भामरागडमध्ये पोलीसांसोबत साजरी केली दिवाळी..

डचिरोली प्रतिनिधी : “गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे.” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जनजागरण मेळाव्यास संबोधीत केले तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

    मुख्यमंत्री म्हणाले, गत दोन वर्षात कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्त्वाचा घटक असून पोलीसांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच, आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम देण्याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात अमुलाग्र बदल झालेला दिसत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाचा आहे. सरकारच्या पाठिंबामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ जिल्हाधिकारी संजय मीणा पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो माळी गुमा मासा शांती कुतु मज्जू चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८