राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ!

मुंबई प्रतिनिधी  : राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17,500 कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन 2022-23 या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने 21,500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात यश मिळवले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.

   राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यार्कयुक्त आणि अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. मंत्री शंभूराज देसाई यांनी बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले. तसेच भरारी पथकांना तपासणी नाक्यांवर प्रभावीपणे सक्रीय केले. यामुळे उत्पादन शुल्क विभागात निर्माण झालेले चैतन्य सरत्या आर्थिक वर्षातील 25 टक्के महसुलवाढीच्या रूपाने प्रतिबिंबीत झाले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८