डोंबिवली सारंगाव उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर पुल सुरू झाल्याने वाचणार एक ते दीड तास !

ठाणे प्रतिनिधी रुण पाटील  :  डोंबिवली सारंगाव (सुरई) उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन ते मुंबई - नासिक महा मार्गावरील मानकोली गाव येथे जोडण्यात येणार असून सदर काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पुलामुळे भिवंडी शहर, ग्रामीण सह डोंबिवलीतून ठाणे केवळ ३० मिनिटांत गाठणे शक्य होणार असल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  डोंबिवली पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी सद्यस्थितीत वाहनचालकांना डोंबिवली पूर्वेकडे येत कल्याण शिळमार्गे कल्याण किंवा मुंब्रा बायपास मार्गाने ये जा करावी लागत आहे. तर भिवंडी शहर व ग्रामीण भागात येण्यासाठी कल्याण - कोन गाव मार्गे यावे लागल्याने संपूर्ण शहराला वळसा घालावा लागतो त्यामूळे वाहनचालकांना एक ते दिड तासांचा वेळ लागतो.ठाणे ते भिंवडी रस्त्याचे रुंदीकरण देखील वेगाने सुरू असल्याने वाहनचालकांना डोंबिवली ते ठाणे वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएने लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

   शहरात पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी २०१३ मध्ये डोंबिवली, मोठागाव ते भिंवडीतील सारंगाव (सुरई) असा उल्हास नदीवर १२२५ मीटर लांब व २७.५ मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पुलासाठी भूसंपादनासह इतर अडचणी उद्भवल्याने या पुलाचे भूमिपूजन होण्यासाठी १८ सप्टेबर २०१६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नंतर या पुलाचे काम सुरू झाल्या नंतरही भूसंपादनाची प्रक्रिया अडथळा ठरली होती. मात्र आता काम प्रगती पथावर आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८