आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी-आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुबई प्रतिनिधी : आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.मंत्रालयातील त्यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेताना मंत्री सावंत बोलत होते. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसचिव अशोक आत्राम लहाने आदी उपस्थित होते.
बदल्यांबाबत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचा आढावा घेताना मंत्री सावंत म्हणाले की आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी https://transfer.maha-arogya.com व अधिकाऱ्यांसाठी https://officertransfer.maha-arogya.com ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या ऑनलाईन प्रणालीवर बदलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. या प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी व्यवस्था असून येथे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निश्चित कालावधीत निरसन करावे. या प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे चुका होतील. चुका सुधारण्यासाठी सहायक पथक तयार ठेवावे. तांत्रिक अडचणी, तक्रारी तातडीने सोडवाव्यात. तक्रारींचे निराकारण केल्यानंतरच तक्रार प्रणालीवरून काढावी. या प्रणालीसाठी ‘बॅक सर्वर’ तयार ठेवावा. सर्वर डाऊन होणार नाही, याची काळजी घ्यावी. सुरूवातीच्या दिवसांमध्ये प्रणालीविषयी आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी सेवा “24 बाय 7” सुरू ठेवावी.
मंत्री सावंत पुढे म्हणाले की राज्यात दुर्गम भागातील आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व डॉक्टरांना मिळणाऱ्या विशेष सवलती, लाभ, सुविधांची माहिती देण्यात यावी. त्यामुळे मेळघाटसारख्या दुर्गम भागाकडे नियुक्त होण्यास कर्मचारी आकर्षित होतील. परिणामी, दुर्गम भागात रिक्त पदे न राहता नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील. आरोग्य विभागातंर्गत सातत्याने दवाखाने व अन्य इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती करण्याची मागणी येत असते. त्यासाठी विभागाची स्वतंत्र बांधकाम यंत्रणा असावी, कायदेविषयक बाबी सांभाळण्यासाठी कायदेविषयक यंत्रणा असावी, याबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी.
शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व आरोग्य सुविधा नि:शुल्क करण्याबाबत कार्यवाही करावी. अन्य राज्यातील आरोग्य यंत्रणेचा अभ्यास करून त्यांच्याकडील चांगल्या बाबी राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विभागाचे पथक पाठवावेत. राज्यात काम पूर्ण झालेले, अर्धवट असलेली व काही कारणास्तव सुरू न होऊ शकलेल्या रूग्णालयांची कारणांसह माहिती देणारा ‘डॅश बोर्ड’ तयार करावा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून गरीब रुग्णांना लाभ होत आहे. आपला दवाखाना येथून उपसंचालक यांनी रुग्ण संख्या, दिलेल्या सेवा, औषधी वितरण याबाबत दैनंदिन अहवाल घ्यावा. खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमून विभागाने गरीब रूग्णांना मदत करावी. तसेच रूग्णालयांमधील खाटांची संख्या, रिक्त खाटांची माहिती देणारे ॲप तयार करावे. औषधी प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. यामध्ये तयार करण्यात आलेल्या घटनेला विधी व न्याय विभागाकडून मान्यता घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत राज्यात औषधांचा पुरवठा थांबू नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
बैठकीत सुंदर माझा दवाखाना, माता सुरक्षित- घर सुरक्षित अभियान, महिलांमधील स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान व उपचार, हिरकणी कक्ष स्थापना याबाबतही आढावा घेतला. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक अधिकारी उपस्थित होते.