३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुबई प्रतिनिधी : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे असे सांगून प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे.असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब 'एक भारत - श्रेष्ठ भारत' या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा”, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
नवी दिल्ली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही महाराजांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यावेळी मंत्री मुनगंटीवार म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे.शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासून करण्यात आला आहे.शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिर येथे जाऊन जगदीश्वराचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथे उपस्थित राहून त्यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक ढोलपथकांचे सादरीकरण पाहिले.
तिथीप्रमाणे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या दिवशी आज सकाळी ध्वज पूजन, पालखी प्रस्थान त्याचबरोबर ध्वजारोहण तत्पूर्वी झाले.सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते सप्तसिंधू जलाभिषेक सिंहासनारोहन मुद्राभिषेक हे विधी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामूहिक राज्यगीत म्हटले गेले. त्यानंतर शासकीय पोलिस मानवंदनाही देण्यात आली.