एसआयटी चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार

बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापन एसआयटी चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या वतीने विकासक व वास्तूविशारद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून गृह विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे.येत्या तीन महिन्यात एसआयटीचे काम पूर्ण केले जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  सदस्य निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर अवैध बांधकामांवर आळा बसला असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नुकतीच ‘रेरा’च्या देशभरातील रेग्यूलेटरची बैठक झाली असून त्यात प्राधिकरणासमोरील अडचणी आणि कार्यपद्धतीमधील बदलांबाबत चर्चा झाली आहे. याअनुषंगाने ज्या सूचना येतील त्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सुधारणा शासन करेल तसेच ज्या सूचना केंद्राकडे पाठवायच्या असतील त्या केंद्र सरकारकडे पाठविल्या जातील.प्राधिकरणावरील रिक्त पदांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रकरणी मानपाडा येथील दाखल गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना तर रामनगर येथे 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री सावे यांनी दिली.संबंधित दुय्यम निबंधकावर कारवाई सुरू असल्याचे सांगून यापुढे ऑनलाईन परवानगीशिवाय नोंदणी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर अभिजित वंजारी जयंत पाटील भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८