मुंबई प्रतिनिधी : इमारत व इतर बांधकाम व्यवसाय मधील बांधकाम कामगारांसाठी १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री खाडे बोलत होते.
कामगार मंत्री खाडे म्हणाले की इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात.या योजनेत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळेचे जेवण पुरविण्यात येते. कोविड काळात बांधकाम कामगारांसोबत नाका कामगार आणि नोंद नसलेल्या कामगारांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्यात संघटित २६ लाख ३८ हजार नोंदणी कामगार असून तीन कोटी ५४ लाख असंघटित कामगार आहेत.कामगाराची नोंदणी करण्याचे काम अद्यापही सुरू असून याबाबत कोणाच्याही तक्रारी असतील तर त्याची चौकशी करू.यामध्ये दोषींवर कारवाई करू. विविध सदस्यांनी केलेल्या सूचनांसाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल.यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सदस्य प्रवीण दरेकर अभिजित वंजारी सतेज पाटील शशिकांत शिंदे सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.