राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

मुंबई प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन शर्मा आदी उपस्थित होते. 

टाटा म्हणजेच विश्वास त्यांच्या सन्मानाने पुरस्काराची उंची वाढली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मीठापासून ते वाहने विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह जगभरात उद्योगक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे नाते आहे.राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल.तत्पूर्वी टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी टाटा यांच्यासमवेत चंद्रशेखरन आदींशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.

  महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८