ऑपरेशन विजय मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट शहिदांच्या स्मृतीस अभिवादन

मुंबई प्रतिनिधी : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  मुख्यमंत्री शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन ऑपरेशन विजय मधील शहिदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मेजर जनरल सचिन मलिक कारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे  कारगिलचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनायत अली सरहद चे संस्थापक संजय नहार ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार अरहम समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया सरहद चे सदस्य अनुज नहार ब्रिगेडियर सुमित कर्नल शशांक लेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लत मॅरेथॉनचे संचालक वसंत गोखले तांत्रिक संचालक सुमित वायकर  फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी कारगिलच्या बारू येथे सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ होणार होता मात्र खराब हवामानामुळे ते बारू येथे पोहोचू शकले नाहीत. मात्र या मॅरेथॉनमधील स्पर्धक द्रास येथे स्मारक बघण्यासाठी आले असता तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली मुख्यमंत्री शिंदे यांनी या स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय लष्करातर्फे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.

  कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले. या युद्धात आपले अनेक जवान शहीद झाले. या जवानांच्या पराक्रमाची महती द्रास युद्ध स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.सरहद संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू असून त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा लष्करी जवानांशी संवाद

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील लष्करी जवानांशी संवाद साधला आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

  सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी द्रास वार मेमोरियल येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पाय गमावलेल्या पिसाळ जिद्दीच्या आधारे सातारा ते संपूर्ण भारतभ्रमण करण्यासाठी दुचाकीवरून निघाले आहेत. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुमारचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय पुस्तकाचे प्रकाशन

  जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८