दीपावली निमित्त महापालिका राबविणार विशेष स्वच्छता मोहिम !

नागरीकांनी देखील या मोहिमेस सहकार्य करण्याचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे आवाहन !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावर कचरा राडा-रोडा पडलेला दिसून येतो.त्यामुळे दीपावली पूर्वी सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील राडा-रोडा साफ करणे रस्त्यावर पडलेला कचरा उचलून घेणे यांसाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.नागरीकांनी देखील रस्त्यावर कचरा न टाकता महापालिकेच्या घंटा गाडीमध्ये विलगीकरण करुन द्यावा आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी या समयी केले.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील परिमंडळ-१ चे उपायुक्त धैर्यशील जाधव विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव उप मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील इतर अधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

  या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागात २० कर्मचारी देण्यात आले असून यामध्ये एकूण ४९ रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमे अंतर्गत पदपथ दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले असून, रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचे काम पाणी पुरवठा विभागाकडे सोपविण्यात आले आहे.विकासकांची बांधकामे संपुष्ठात आल्यावर तेथील खडी-माती रस्त्यावर पडू नये याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी नगररचना विभाग व पर्यावरण विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रस्त्यालगत असलेली झाडी-झुडपे छाटणे दुभाजकांमधील झाडांचे संगोपन करणे हे काम उद्यान विभागाच्या अधिनस्त देण्यात आले आहे.

 त्याचप्रमाणे फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम सर्व प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त यांचेवर सोपविण्यात आले आहे.तसेच खाजगी मालक/विकासकांच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर पडणारा कचरा उचलुन घेणे त्यांना नोटीस बजाविणे ही जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागावर सोपविण्यात आली आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत १० जेसीबी व २० डंपर या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८