कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक आज महापालिकेच्या मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली. सदर बैठकीस मा.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमन वेंकटेशन जी आणि मा.सदस्य डॉ.पी.पी. वावा जी सोशल ॲडवायझर गिरीधर नाथ जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त अशोक शिनगारे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी विविध कर्मचारी संघटनांनी आपले प्रश्न आयोगापुढे मांडले. कंत्राटी तत्वावर किती कर्मचारी घेतले आहेत व कार्यरत आहेत आणि त्यांना किमान वेतन दिले जाते का ? नियमानुसार ईपीएफ, ईएसआयसी कपात होते का ? सफाई कामगारांचा विमा कंत्राटदारांकडून काढला जातो का ? किती पगार दिला जातो ? अशी विचारणा मा.राष्ट्रीय सफाई आयोगाने उपस्थित सफाई कर्मचा-यांना केली त्यावेळी कंत्राटदारांकडून वेळेवर पगार दिला जात नाही अशी माहिती उपस्थित सफाई कर्मचा-यांनी दिल्यानंतर सदर कर्मचा-यांना वेळेवर पेमेंट व नियमानुसार कपात करणेबाबतचे निर्देश मा.राष्ट्रीय सफाई आयोगाने संबंधित अधिका-यांना दिले.
कोवीड कालावधीत काम केलेल्या कामगारांना कोरोना भत्ता देण्यात यावा, अशी सूचना कर्मचारी संघटनेकडून प्राप्त झाल्यावर याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा.राष्ट्रीय सफाई आयोगाने संबंधित अधिका-यांना दिले. त्याचप्रमाणे कोवीडमध्ये कर्तव्यावर असताना कोवीडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचा-यांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार अदायगी करण्यात आली का ? अशी विचारणा मा.राष्ट्रीय सफाई आयोगाने केल्यानंतर अशा सफाई कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी रु. 50 लाख देण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिल्यानंतर कोवीडमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचा-यांच्या वारसांना सीएम फंडातून रुपये 50 लाख आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून रुपये 50 लाख असे रुपये 1 कोटी शासनाकडून प्राप्त होऊ शकतील तरी असा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा अशा सूचना राष्ट्रीय सफाई आयोगाने सामान्य प्रशासनाच्या उपायुक्ताना दिल्या.
सफाई कर्मचारी रहात असलेल्या वसाहतीमध्ये त्यांना कायमस्वरुपी जागा देण्यात यावी अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेमार्फत पुढे आली. त्यावेळी आरक्षण क्र. 40 मध्ये रिजर्वेशन ॲकोमोडेशनमध्ये प्रती कुंटूंब 300 चौ.फु. जागा देता येईल अशी माहिती सहा.संचालक नगररचना दिशा सावंत यांनी दिली.सफाई कर्मचारी राहत असलेल्या 5 ठिकाणच्या वसाहतीमध्ये त्यांना कायमस्वरुपी जागा देणेबाबत कायदेशीर बाबी तपासून पूर्तता करावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई आयोगाचे सोशल ॲडवायझर गिरीधर नाथ यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.