राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या मुंबईतील नव्या कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील सर्व महत्वाची कार्यालय ही मुंबई येथे आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे. हे कार्यालय महाराष्ट्र व गोवा या राज्यासाठीचे राज्य कार्यालय असणार असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी दिली.

  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या मुंबईतील नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आयोगाचे सदस्य सुभाष पारधी अंजू बाला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.हलदर म्हणाले अनुसूचित जातींसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगामार्फत घेण्यात येतो.योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आयोगामार्फत राज्याच्या विविध विभागांना निर्देश देण्यात येतात. अनुसूचित जातीच्या समाजातील समस्यांचे निराकरण मुंबई येथील कार्यालयातून करण्यात येईल.आयोगाने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे त्यामुळे ऑनलाईनही तक्रार नोंदविता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  पारधी म्हणाले अनुसूचित जातीतील समाजाच्या लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मुंबई येथील कार्यालय हे सोयीचे झाले आहे. राज्यातील सर्व भागातील लोक मुंबई येथे कामानिमित्त येतात. सर्व क्षेत्रिय कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे लोकांना मुंबई येथे येणे सोयीचे आहे.सदस्या अंजू बाला म्हणाल्या अनुसूचित जातीतील समाजाच्या लोकांनी आयोगाकडे आपल्या समस्या मांडण्यासाठी यावे. लोकांना आपले हक्क माहिती करुन द्यावेत. आयोग नागरिकांच्या हक्कासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  सहसचिव दिनेश डिंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक कौशल कुमार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.तर मागासवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.हे कार्यालय निष्ठा भवन चौथा मजला सीजीओ बिल्डिंग चर्चगेट येथे सुरू झाले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८