राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा दिलासा-आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला.विविध पातळ्यांवर बैठका घेवून संबंधितांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले.तसेच याबाबत नियमित आढावाही घेतला.
या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे.तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिताचे सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या ३० टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे.तर ७० टक्के पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढया नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करुन समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली आहे.