लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी नागरिकांनी आवर्जून मतदान करावे-मुख्यसचिव नितीन करीर
मुंबई प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे.त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती विषयक कार्यक्रमात मुख्यसचिव करीर बोलत होते.
या कार्यक्रमाला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.दिनेश वाघमारे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदारांनीही या प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार आहेत असेही करीर यांनी यावेळी सांगितले.