एमआयडीसी’तर्फे धारावीत दोन लाख किलो धान्याचे वाटप

एमआयडीसी’तर्फे धारावीत दोन लाख किलो धान्याचे वाटप


 मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायम सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धारावी परिसरातील गरजू नागरिकांना दोन लाख किलो धान्याचे वाटप करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून अन्नधान्याने भरलेल्या ट्रक रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते.


        मुंबईतील धारावी परिसराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या परिस्थितीत येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमआयडीसीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविला. धारावी येथील कामराज ज्युनियर कॉलेजमधून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी धान्य, तांदूळ, आटा, तेल, तूरडाळ, रवा, मसाला, मीठ, साबण आदींचे वाटप करण्यात आले. एकूण दोन लाख किलो धान्याचे आज वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मारुती कलकुटकी, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता राजेश मुळे व प्रशांत चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मिशेल झेवियर आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना सामाजिक अंतराचे महत्व विषद करण्यात आले. या उपक्रमास धारावी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही मदतीचा हात दिला.


  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ९० कोटींचा निधी


       उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने मागील अडीच महिन्यांपासून राज्याच्या विविध भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख किलो धान्याचे वितरण करण्यात आले आहे. याखेरीज ‘मुख्यमंत्री-कोविड १९-मदत निधीस’ विविध उद्योगसमूहांकडून व कर्मचारी वेतनातून एकत्रित केलेली १०० कोटींची रक्कम देण्यात येत आहे. यापैकी ९० कोटी रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात आले आहेत. शिवाय १५५ व्हेंटीलेटर्स, ५० हजार पीपीई किट्स, ८.५ लक्ष मास्क इत्यादी साहित्य एमआयडीसीमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरविण्यात आले आहे.


   दहा दिवसांत औरंगाबादमध्ये कोविड रुग्णालय कार्यान्वित होणार


     एमआयडीसीने औरंगाबाद शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात विनावापर राहिलेल्या पूर्वीच्या मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यास सुरुवात केली असून ते रुग्णालय पुढील १० दिवसांत महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिली.


     दिगंबर वाघ


                 कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                     घरी राहा, सुरक्षित राहा 
                  प्रशासनाला सहकार्य करा...