गर्भवती दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना
वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी - ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-१९ चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने ॲड. ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, कोविड-१९ चा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस व श्वसनशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोविड संसर्गातून धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी; खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा. तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏