MMRDA पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती
एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार पदांच्या, भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे
मुंबई प्रतिनिधी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सद्यस्थितीत कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरित झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने एमएमआरडीए अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे सुमारे १७ हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदे भरली जाणार आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. एमएमआरडीएचे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.
ही रिक्तपदे भरण्याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे आयोजन करणे शक्य व योग्य नसल्याने या विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
अर्ज कसा करावा
राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment - Job Seeker (Find a Job) - Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच, ज्यांनी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment - Job Seeker (Find a Job) - Register वर क्लिक करुन सर्व माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment - Job Seeker (Find a Job) - Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai City अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action - view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधित उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक आदी माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छुक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏