माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादनमुंबई प्रतिनिधी : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. 


     उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच आजच्या कृषी दिनानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांना, जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, ‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांच्या दूरदृष्टी व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहती. त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील. स्वर्गीय नाईक साहेबांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.


      उपमुख्यमंत्री पुढे म्हणतात, स्वर्गीय वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. 'संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे' हा विचार त्यांनीच दिला. त्यांचा जन्मदिवस 'कृषी दिन' म्हणून साजरा करत असताना नाईक साहेबांनी दाखवलेल्या 'कृषी विकासा'च्या वाटेवरच राज्य सरकार वाटचाल करत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.


           दिगंबर वाघ                


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏