जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील २ रूग्णालयाचा समावेश
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश
-- आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
मुंबई प्रतिनिधी : सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले.
बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर हॉस्पीटल या दोन रुग्णालयांचा जन आरोग्य योजनेत सहभाग करून घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ.यड्रावकर यांनी पाठपुरावा केला होता.
डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटलचे सुमारे २००० बेड व विशेषज्ञ सुविधा या योजनेतंर्गत उपलब्ध होणार असून कॅन्सर हॉस्पीटलमधील १२५ बेड उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कर्करोग उपचार, शस्त्रक्रिया, रेडीएशन आदी सुविधा मिळणार आहेत.
राज्यात जन आरोग्य योजनेमध्ये यापूर्वी ४५० रुग्णालयांचा सहभाग होता त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत दुप्पट म्हणजे १००० रुग्णालयांचा सहभाग करण्यात आला आहे. राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, असे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏