देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून


जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा


           -उपमुख्यमंत्री अजित पवार



मुंबई प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगर-दऱ्या, रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण, संवर्धन तर केलेच, बरोबरीने प्रथा-परंपरा, लोककला, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून देशाचे सांस्कृतिक वैभव समृद्ध केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांचा गौरव केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आदिवासी समाजबांधवांना त्याग, शौर्य, देशप्रेमाचा गौरवशाली इतिहास आहे. राष्ट्रउभारणीत आदिवासी बांधवांचे मोठे योगदान आहे. समाजाने कायमच निसर्गाशी नात जपल आहे. हे नात जपत असताना आधुनिक काळाचा वेध घेऊन आदिवासी युवक आज उच्च शिक्षण घेवून जीवनाच्या अनेक क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी  महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने दिला आहे.


उपमुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण;


देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा


कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची


आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया... 


       देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि देशवासियांना ‘करेंगे या मरेंगे’चा संदेश दिला. महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या त्या निर्णायक आंदोलनाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या ऐतिहासिक दिवसाचे, 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहिद झालेल्या वीर सैनिकांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी देशातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रमुख नेते तुरुंगात गेले तरी त्यांची जागा घ्यायला नवनवीन तरुण पुढे येत होते. आपला देश आज स्वतंत्र, सार्वभौम असून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, याचं श्रेय आपल्या पूर्वजांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याला आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता चिरंतन ठेवण्याचा निर्धार आपण करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.


      9 ऑगस्ट 1942 ला आपल्या पूर्वजांनी इंग्रजांपासून मुक्तीचा लढा तीव्र केला होता. आज 9 ऑगस्ट 2020 ला आपल्याला कोरोनापासून मुक्तीचा लढा तीव्र करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करुया. यंदाचा ऑगस्ट क्रांतीदिन हा कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची सुरुवात ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


        दिगंबर वाघ                


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏