मंत्रिमंडळ बैठक एकूण 3 निर्णय

मंत्रिमंडळ बैठक  24 नोव्हेंबर 2020


एकूण निर्णय-3



मुंबई प्रतिनिधी :


धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन


       आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रती क्विंटल सातशे रुपये (Paddy Procurement Incentive Support) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  या निर्णयामुळे 1400 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल .खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी 1868 रुपये व ग्रेड धानासाठी 1888 रुपये इतकी निश्चित केली आहे.  मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला.  केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही राशी मिळेल.  या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल. 


शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु


        राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये  शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 पासून एकूण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 21 केंद्रामध्ये तसेच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यात 9 कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु होणार आहेत. यंदा कापूस पेरा 42.86 लक्ष हेक्टरमध्ये झालेला असून एकूण 450 लक्ष क्विंटल पर्यंत कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय कापूस खरेदी निगम (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे तंतोतंत नियोजन करण्यात आले आहे.


सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि


500 रुग्ण खाटांचे रुग्णालय


     सिंधुदूर्ग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय संलग्न करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2021-22 मध्ये सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2020 पूर्वी केंद्र शासनास / राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगास सादर करण्यात येणार आहे.  राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन त्यानुषंगाने नवीन महाविद्यालय सुरु करणे गरजेचे आहे. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता सिंधुदूर्ग जिल्ह्यात देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


      प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 966.08 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.   तसेच, आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान 20 एकर जागेसह) कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास हस्तांतरीत करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)


कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स


मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना


      कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे, ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.या टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील. या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..