रायगड जिल्ह्यात विधी महाविद्यालय स्थापन होणार

रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन होणार


प्रस्ताव त्वरित सादर करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिले निर्देश



मुंबई प्रतिनिधी : माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर नियोजित शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विभागाने त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. कोकण विभागासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव परिसरात शासकीय विधी महाविद्यालय सुरु व्हावे, अशी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी व पालक यांची मागणी होती. त्यास अनुसरुन विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री  आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री  आदिती तटकरे यांच्यासह रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक  माने, सह संचालक संजय जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.


     यावेळी राज्यमंत्री  तटकरे म्हणाल्या, मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या मौजे जावळी ता. माणगाव येथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सुमारे 4 हेक्टर शासकीय जमिनीवर शासकीय विधी महाविद्यालयाची स्थापना झाल्यास रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शिवाय महाविद्यालयासाठी आवश्यकतेहून अधिक जागा उपलब्ध असल्याने भविष्यात होणाऱ्या महाविद्यालयीन विस्तारासाठी या जागेचा उपयोग होऊ शकेल. या बैठकीच्या अनुषंगाने सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय यांनी सदर जागेची तातडीने पाहणी करुन विभागामार्फत प्रस्ताव सादर करावा, तसेच जावळी ता. माणगाव येथे शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  सामंत यांनी यावेळी संबंधितांना  दिले.


 दिगंबर वाघ  


 कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..