शिवणे कोंढवे धावडे पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कारवाई

शिवणे, कोंढवे, धावडे पाणीपुरवठा योजना

पुणे महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत शासन सकारात्मक

- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिवणे, कोंढवे, धावडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सांगितले. यासंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शिवणे, उत्तमनगर कोंढवे-धावडे व न्यू कोपरे ही चार गावे पुणे महानगरपालिकेच्या वारजे गावाच्या हद्दीलगत वसलेली आहेत. यापैकी शिवणे व उत्तमनगर यांचा पुणे महानगर पालिकेत समावेश करण्यात आला आहे. उर्वरित दोन गावांचा आधी पुणे महानगरपालिकेत समावेश करायचा झाल्यास पुणे महानगरपालिकेने ठराव संमत करावा लागेल. त्यानंतर  केल्यास काही अटी व शर्तींच्या आधारे ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्यात विभागाची काहीच हरकत राहणार नाही असे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी पुणे महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. थकबाकी संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक आठवड्याच्या आत बैठक घेवून त्यातून मार्ग काढावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

       शिवणे, कोंढवे धावडे परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2012 मध्ये हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने  कार्यान्वित केला. परंतु या चारही गावांची लोकसंख्या अनियंत्रित व झपाट्याने वाढल्याने सध्या होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा अशी महानगरपालिकेची मागणी आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

      या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत काम करणाऱ्या 24  कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे कर्मचारी काही अटी व शर्तीचे पालन करून महानगरपालिकेकडे देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची हरकत नाही असे पाणीपुरवठा मंत्री  पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगरसेवक सचिन दोडके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह नगरविकास, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगरपालिका तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏