ट्रान्स्फर फी आणि प्रीमियम याबाबत...

 ट्रान्स्फर फी आणि प्रीमियम याबाबत... 

                                    भाग ८ 

ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे 

 दर आठवडयाला,दर सोमवारी...

   घर/दुकान नोंदणी केल्यावर संस्थेचे सदस्य बनण्याकरता अर्ज करावा लागतो. सदर अर्ज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत ठेवून त्यावर निर्णय घेतला जातो. तो निर्णय सदर अर्जदारास कळविण्यात येतो. अर्जासोबत काही इतर कागदपत्र सोबत जोडावी लागतात. अनेकवेळा आपल्यापैकी बहुतेकांना प्रवेश फी/हस्तांतरण फी आणि अधिमुल्य किती याची माहिती नसते. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी...

प्रश्न क्र. ३८) हस्तांतरण फी (ट्रान्स्फर फी) म्हणजे काय ?

उत्तर:  उपविधी क्र. ३८(ई) (७) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे भोगवट्याच्या हक्कासह आपले भागपत्र (शेअर्स) हस्तांतरकाने हस्तांतरित करण्यासाठी त्याच्याकडून संस्थेला देय असलेली रक्कम, असा आहे. प्रत्येकी ५० रुपयांची ५/१० इतकी भागपत्रे. नवीन उपविधी प्रमाणे प्रत्येकी ५० रुपयांची १०/२० इतकी भागपत्रे.

प्रश्न क्र. ३९) अधिमुल्य (प्रीमियम) म्हणजे काय? सदनिका कुटुंबातील व्यक्तीला हस्तांतरीत करताना किवा ट्रान्स्मिशन करताना अधिमुल्य द्यावे लागते का ?

उत्तर:  सदस्याने आपली भागपत्रे व संस्थेच्या भांडवली मालमत्तेतील आपला हितसंबंध हस्तांतरित करते वेळी, संस्थेस उपविधी क्र. ३८(ई) (९) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे हस्तांतरण फी व्यतिरिक्त देय असलेली रक्कम, असा आहे. संस्थेच्या भांडवलामध्ये मालमत्तेतील सदस्याचे भाग व हितसंबंध, त्यांच्या कुटुंबीयांकडे किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीकडे अथवा त्या सदस्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे करताना अथवा सदस्यांमधील आपापसातील सदनिका बदलासाठी अधिमुल्य देणे लागू असणार नाही. 

प्रश्न क्र. ४०) अधिमुल्य आकारण्यास संस्थेस काही बंधने घालण्यात आली आहेत का ?

उत्तर:  सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ९ ऑगस्ट, २००९ रोजी परिपत्रक काढले असून त्यात त्यांनी आदेश दिलेत की, संस्था सर्व साधारण सभेत ठरविलेले अधिमुल्य दर कोणत्याही परिस्थितीत खाली दर्शविण्यात आलेल्या कमाल दरापेक्षा जास्त असू नये.

१) महानगरपालिका व प्राधिकरण क्षेत्र रु. २५,०००/-

२) “अ” वर्ग नगर पालिका रु. २०,०००/-

३) “ब” वर्ग नगर पालिका रु. १५,०००/-

४) “क” वर्ग नगर पालिका रु. १०,०००/-

५) ग्रामपंचायत (ग्रामीण क्षेत्र) रु. ५,०००/-

प्रश्न क्र. ४१) कुटुंब या व्याख्येमध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश होतो ?

उत्तर:  पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, जावई, मेहुणा (बायकोचा भाऊ), मेहुणी (पत्नीची बहिण), सून, नातू, नात, बहिणीचा पती यांचा समावेश होतो, अशा व्यक्तींचा समूह कुटुंब या व्याख्येत येतो.

प्रश्न क्र. ४२) संस्था डोनेशन स्वीकारू शकते का ?

उत्तर:  होय. परंतु संस्था डोनेशन हे सदनिका किंवा गाळा हस्तांतरीत करताना ट्रान्स्फरर किवा ट्रान्स्फरीकडून घेऊ शकत नाही.

प्रश्न क्र. ४३) प्रवेश फी म्हणजे काय? किती असते ?

उत्तर:  संस्थेतील मूळ सदस्य आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो आणि नवीन सदस्य संस्थेचा सदस्य बनण्यासाठी विनंती करतो. सोबत रु. १००/- ही प्रवेश फी असते, नविन दस्त आणि ट्रान्स्फर सेट संस्थेस जमा करतो. 

मागील लेखाबाबत अथवा आपल्या प्रश्नाबाबत अधिक माहितीसाठी खालील इमेलवर संपर्क साधू शकता.

vishal@vlawsolutions.com

(ॲड. व्ही लॉ सोल्युशनस चे संस्थापक आहेत)

दिगंबर वाघ 
        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८

        

            🙏  एक वचन तीन नियम  🙏

       १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा