कन्नड ग्रामीण रुग्णालय झाले रेफर सेंटर

★ सोनोग्राफी सेंटर,एक्स-रे , ट्रॉमा सेंटर बंद

★ आला रुग्ण की पाठव औरंगाबादला ,साधी सिझरिंगचीही सोय नाही.

कन्नड बातमीदार : भौगोलिकदृष्ट्या व लोकसंख्येच्या द्रुष्टीने मोठ्या असलेल्या  तालुक्यासाठी कन्नड शहरात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी रुग्णांसाठी मंजूर असलेल्या सुविधाच बंद आहेत. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिक्षक व अधिकारी आलेल्या रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करत आहेत, या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे,अनिता लाडे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

        यासंदर्भात लाडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक डॉ. दत्तात्रय देगावकर यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, सदरील ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन बंद आहे, याठिकाणी टेक्निशियन नाही, लॅब टेक्निशियन नसल्याने रक्ततपासण्या होत नाहीत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, ठाकर,भिल्ल,बंजारा, भोई हा समाज राहतो. या वंचित घटकातील गरोदर महिलांना सोनोग्राफी, एक्स-रे या सुविधा नसल्याने नाईलाजाने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागते. एका वेळच्या सोनोग्राफी तपासणीसाठी सातशे ते आठशे रुपये खर्च येतो. हे या गरिब कुटुंबाला परवडत नाही. बाळाची  व मातेची स्थिती न समजल्याने अनेक गर्भवती मातांचे  व नवजात बाळांचे जिव धोक्यात सापडत आहे. बर्याचदा सिझरिंगही करावे लागते. येथील ग्रामीण रुग्णालयात सिझरिंग प्रसुतीस टाळाटाळ करण्यात येते. ऐनवेळी वैद्यकीय अधिकारी त्यासाठी औरंगाबाद, घाटी रुग्णालयात रेफर करतात. अडचणीत सापडलेल्या मातांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. याठिकाणी त्यांना विस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक कुटुंबं आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण रुग्णालयातच सर्व यंत्रणा सक्षमपणे सुरू करून शासनाने निर्धारित केलेल्या वैद्यकीय सुविधा येथे तत्काळ सुरू कराव्यात, सर्व वैद्यकीय अधिकार्यांनी मुख्यालयी थांबून रुग्णांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख लाडे यांनी केली आहे.

  यासंदर्भात वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय देगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लाडे यांनी मला निवेदन देण्यापेक्षा विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना निवेदन दिले तर प्रश्न मार्गी लागतील. गेल्या तीन वर्षांपासून लॅब टेक्निशियनच्या दोन जागा रिक्त आहेत. एक्स-रे टेक्निशियनची एक जागा दिडवर्षांपासून रिक्त आहेत. वर्ग चारच्या चार जागा रिक्त आहेत. आमदार सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रिक्त जागेवरील पदे भरुन घ्यावीत.  एप्रिल, मे महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. आमदारांनी लक्ष घातल्यास हे प्रश्न निकाली निघतील.कोरोना साथरोगामुळे शासनाच्या आदेशानुसार सात आठ महिन्यांपूर्वी आम्हाला पत्रं प्राप्त झाले आहे. त्यामुळे सिझरिंग शस्त्रक्रिया व ओपीडी थांबवली आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश कुटुंबे ऊसतोडणीसाठी बाहेर गावी गेलेली आहेत. ऑक्टोबर ,नोव्हेंबरमध्ये ते तालुक्यात परततील तेव्हा पुर्ण क्षमतेने ओपीडी पुन्हा सुरू करण्यात येईल. सध्या ग्रामीण रुग्णालयात तीन व ट्रॉमासेंटरला पाच असे आठ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

त्यापैकी एक अधिकारी डॉ. ऋतुजा थोरात प्रसुती रजेवर गेल्या आहेत. एका वैद्यकीय अधिकार्यांच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे सध्या सहाच अधिकारी कार्यरत आहेत. कन्नड ग्रामीण रुग्णालयात कोवीड सेंटरवर सध्या त्रेचाळीस रुग्ण उपचार घेत आहेत. शिवाजी महाविद्यालय कोविड सेंटरवर व ग्रामीण रुग्णालय सेंटर या दोन्ही ठिकाणी एकूण एकशे अडोतिस रुग्ण दाखल झालेले आहेत. ग्रामीण रुग्णालयात चाळीस खाटांची सोय आहे. तेथे पन्नास खाटा करण्यात येणार आहेत.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८