शीव रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कार्यशाळा संपन्न

अविरतपणे काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासह शारीरिक व भावनिक क्षमतावृद्धीसाठी कार्यशाळेचे आयोजन

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यशाळा

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने "कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ महापालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत आहेत. यामुळे जनसामान्यांमध्ये महापालिकेच्या रुग्णालयांवर असणारा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अविरतपणे रुग्णसेवा करत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने वैद्यकीय सेवा देता याव्यात, यासाठी त्यांचे मनोबल उंचावणे आणि शारीरिक क्षमता वृद्धी होणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष क्षमतावृद्धी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे', अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)  सुरेश काकाणी यांनी दिली आहे. ते आज शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी आयोजित पहिल्या क्षमतावृद्धी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर रमेश भारमल, के. ई. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख, उपनगरीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप जाधव आणि शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी; यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

       'कोविड - १९' या साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर अविरतपणे कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भावनिक, मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धी व्हावी; यादृष्टीने रुग्णालयांच्या स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार अशा प्रकारच्या पहिल्या कार्यशाळेचे आयोजन आज शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात आज (दि. २९ एप्रिल २०२१) करण्यात आले.या कार्यशाळेच्या सुरुवातीला अतिरिक्त महापालिका आयुक्त  सुरेश काकाणी यांनी उपस्थितांशी संवाद साधत कार्यशाळा आयोजित करण्यामागच्या उद्देश सविस्तरपणे नमूद केला. त्यानंतर शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी वैद्यकीय व्यवसायात रुग्णांशी संवाद साधण्याचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन व आपले अनुभव सांगत अधोरेखित केले. 

             त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात शीव रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ प्रा. डॉक्टर श्रीमती सुषमा सोनावणे यांनी वैद्यकीय व्यवसायात संपर्क कला कशी साधावी? व मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भौतिकोपचार तज्ञ व सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विशाखा पाटील यांनी आरोग्याचे सुलभीकरण व शारीरिक सक्षमीकरण याविषयी अतिशय साध्या सोप्या शब्दात उपस्थितांशी संवाद साधला.तर ताणतणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकंदरीत आयुष्यातील विनोदाचे व हास्याचे महत्त्व याविषयी सुप्रसिद्ध विनोदवीर  एहसान कुरेशी व अली असगर यांनी हलक्याफुलक्या व प्रभावी शब्दांत आपली मते अनेक उदाहरणे व विनोदी किस्से सांगत मांडली.तर आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी सुगठन शल्यचिकित्सा (Dept. of Plastic Surgery) विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकुंद जगन्नाथन यांनी संगीत व गाणी विषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कान बंद नाक व घसा विभागाच्या प्रमुख डॉक्टर  रेणुका ब्राडो यांनी केले. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या पुढील कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन केले जाणार असल्याची माहिती यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८