कल्याण पश्चिम व डोंबिवली येथील लाॅन्स सील झाले ?

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी आपापल्या प्रभागात परिस्थितीची पाहणी केली. ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 06 दुकाने सील करण्यात आली. क प्रभागात 2 मॅरेज लॉन्स 30 एप्रिल पर्यंत सील करण्यात आली. फ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलरचे दुकान अशी 2 दुकाने तसेच 90 फुटी रोडवरील 3 दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ग प्रभागात सत्यम सोशल क्लब व 2 दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ई प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच 2 वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई केली. कोरोना साथीच्या  प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा अथक काम करीत असताना या कामात महापालिकेच्या नागरिकांनी देखील कोरोना नियमावलीचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिम येथील मॅरेज लॉन्स यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्याची कारवाई ! 

      कल्याण पश्चिम येथील भवानी मॅरेज लॉन्स व वैष्णवी मॅरेज लॉन्स येथे दि.03/04/2021 रोजी रात्री लग्न समारंभाच्या कार्यक्रमाकरीता केवळ 50 व्यक्तिंना सहभागी करण्याचे आदेश असतांना देखील सदर स्थळी 900 ते 1000 लोकांची गर्दी जमा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे महात्मा फुले चौक‍ पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी सदर लग्न समारंभाचे आयोजक सुनिल राजाराम वायले,सुरेश गंगाराम म्हात्रे आणि मॅरेज लॉन्स व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग यांचे विरुध्द्व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महात्मा फुले पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 225/2021 भादवी 188,269,270 व साथीचे रोग अधिनियम (2)(3)(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कोविड नियमांचे उल्लघन केल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार सदर दोन्ही लॉन्स 30 एप्रिल पर्यंत सील करण्याची कारवाई आज 3/क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांचे मार्फत करण्यात आली.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८  ‍