ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा प्रशिक्षणाचा शुभारंभ

ज्येष्ठ नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे

- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई प्रतिनिधी : समाजात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढत असून त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था, आधार आणि सेवा उपलब्ध करुन देणे ही गरज आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा ही केवळ सेवा, करुणा या दृष्टीकोनातून पाहण्याची बाब नसून भविष्यात एक मोठा सेवा उद्योग (सर्व्हिस इंडस्ट्री) यातून उभा राहणार आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रिजनल सिसोर्स ट्रेनिंग सेंटर (आरआरटीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा प्रशिक्षणाच्या ऑनलाईन शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक  श्रद्धा जोशी, आरआरटीसीच्या अध्यक्षा आणि माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, राज्य कोविड टास्क र्फोर्सच्या सदस्य आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, आरती ड्रग्ज लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील, शुश्रुषा हॉस्पिटलच्या माजी अधीष्ठाता डॉ. रेखा भातखंडे, इकोइंग हेल्दी एजिंगच्या  अमृता पाटील यावेळी उपस्थित होत्या.

       उपसभापती डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, जागतिकीकरण, उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणात युवा वर्ग शिक्षणासाठी परदेशात जाऊन तेथेच स्थायिक व्हायला लागला. देशातही कुटुंबे चौकोनी, त्रिकोनी असा बदल झाला. त्यामुळे शहरांमध्ये ज्येष्ठांची काळजी घेण्यात अडचणी यायला लागल्या असून ‘ज्येष्ठ नागरिक रुग्णसेवा’ ही एक चांगली संकल्पना असून समाजातील मोठी गरज बनली आहे. भविष्यात यात व्यवसायिक पद्धतीने काम करणारे उद्योगही पुढे येऊ शकतील.त्या पुढे म्हणाल्या की, सध्याच्या कोरोना परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्रकर्षाने समोर आले आहेत. माविम आणि आरआरटीसीने त्यांच्या रुग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेऊन प्रशिक्षित आणि व्यावसायिक महिला रुग्णसेवक घडवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नागरिकांचा दिनक्रम सुखा समाधानाने कसा जाईल हे पाहणे रुग्णसेवकाचे काम आहे. शहरांमध्ये निवासी वृद्धाश्रमांबरोबच अल्पकालिन वृद्धाश्रमांचीही गरज भासू लागली आहे. जोडीने राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच एकाकी ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रमाणे रुग्णसेवकांच्या सेवेची आवश्यकता लागते; त्याचप्रमाणे छोट्या कुटुंबातील सदस्यांना बाहेरगावी जायचे असल्यास ज्येष्ठ नागरिकांनाही काही वेळा पंधरा-वीस दिवसांसाठी अल्पकालिन वृद्धाश्रमात ठेवण्याची गरज भासते. अशा वृद्धाश्रमातील प्रशिक्षित रुग्णसेवकांना रोजगाराची संधी मिळू शकते, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

       माविमच्या अध्यक्षा ठाकरे यावेळी म्हणाल्या, महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी माविम काम करत असून सुमारे साडेसोळा लाख महिलांचे संघटन उभे राहिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची तसेच महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन हे प्रशिक्षण हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईला जवळ असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील महिलांची निवड केली असून दोन सत्रात प्रत्येकी 20 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाईल. पुढील काळात राज्यातही असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सध्या कोरोना परिस्थितीमुळे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार असून पुढील काळात प्रात्यक्षिक प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) घेण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विशेष म्हणजे या सर्व प्रशिक्षणार्थींना रोजगार, नोकरीची संधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर म्हणाल्या की, उपलब्ध माहितीनुसार सध्या देशात सुमारे 11 कोटी ज्येष्ठ नागरीक असून पुढील 15-20 वर्षात ही संख्या 25 कोटीच्या घरात जाईल असा अंदाज आहे. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये ज्येष्ठांची काळजी घेणे सोपे जाते. परंतु, शहरीकरण, रोजगारासाठी स्थलांतर यामुळे ज्येष्ठ नागरिक एकाकी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन हे रुग्णसेवा प्रशिक्षण देण्याची संकल्पना पुढे आली.

      डॉ. शुभा राऊळ यांनी ज्येष्ठांची आपुलकी आणि व्यवसायिक अशा दोन्ही बाबींची सांगड घालत रुग्णसेवकांनी सेवा करण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठांना मानसिक आधार देणे गरजेचे असून त्यांचे छंद जपण्यात, लसीकरण, आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी रुग्णसेवकांनी काम करावे, असे त्या म्हणाल्या.सविता मालपेकर यांनी ज्येष्ठांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून कोरोना कालावधीमध्ये नाट्य- चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नागरिकांना आधाराची गरज असल्याचे सांगितले. त्यावर उपसभापती ॲड. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ कलावंतांची यादी करण्याची सूचना केली. तसेच त्या अनुषंगाने काही मदत करता येईल का यादृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. श्रद्धा जोशी यांनी माविमने कोविड काळात सदस्य महिलांना रोजगार मिळवून देण्यासह या महिलांच्या माध्यमातून मास्कनिर्मिती, धान्य बँक, अल्पदराने भाजीविक्री, शिवभोजन थाळी केंद्रांचे संचालन समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. कोरोना नंतरच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन हे प्रशिक्षण हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी अमृता पाटील यांनी रुग्णसेवा अभ्यासक्रमाच्या स्वरुपाची माहिती दिली. सामाजिक जाणिवेतून या प्रशिक्षासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.डॉ. रेखा भातखंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक उत्तरा मोने यांनी केले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८