या विस्‍तारित सुविधेचे हिंदुजा रुग्‍णालय करणार व्‍यवस्‍थापन

 महानगरपालिका व हिंदुजा रुग्‍णालयाच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नातून दादरमध्‍ये लवकरच सुरु होणार २० रुग्‍णशय्येचे 'कोविड एचडीयू' रुग्‍णालय

सभागृह नेता  विशाखा राऊत, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त  संजीव जयस्‍वाल यांनी केली पाहणी

 • छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्‍काऊट-गाईड सभागृहामध्‍ये जी/उत्‍तर विभागाने अल्‍पावधीत बांधले रुग्‍णालय

  • एनवाय फाऊंडेशनकडून सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी

मुंबई प्रतिनिधी : कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने २० रुग्‍णशय्या क्षमतेचे 'कोविड एचडीयू' (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारले आहे. अल्‍पावधीत उभारण्‍यात आलेल्‍या सदर रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून केले जाणार आहे. महानगरपालिकेच्‍या सभागृह नेता  वि‍शाखा राऊत व अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) संजीव जयस्‍वाल यांनी आज (दिनांक २८ एप्र‍िल २०२१) या सुविधेची पाहणी केली. हे रुग्‍णालय लवकरात लवकर कार्यान्‍व‍ित करण्‍याचे निर्देश  जयस्‍वाल यांनी द‍िले आहेत.मुुंबईत कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या वाढीस लागल्‍यानंतर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी असलेली रुग्‍णालयं तसेच समर्पित कोविड आरोग्‍य केंद्रांमधील रुग्‍णशय्यांची क्षमता वाढविण्‍याची कार्यवाही जलदगतीने सुरु केली आहे. त्‍यातही ऑक्सिजन सुविधा, अतिदक्षता उपचार यावर भर दिला जात आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर)  संजीव जयस्‍वाल हे स्‍वतः वेगवेगळ्या जंबो कोविड केंद्रांना भेटी देऊन सातत्‍याने त्‍याची पाहणी करीत आवश्‍यक ते निर्देश देत आहेत.

        दादर परिसरातील रुग्‍णांसाठी देखील अतिदक्षता उपचार सुविधा निर्माण करण्‍याचे निर्देश  जयस्‍वाल यांनी दिले होते. त्‍यानुसार जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त  किरण दिघावकर यांच्‍या प्रयत्‍नाने दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉल प्रशासनाने ताब्‍यात घेतला. सदर रुग्‍णालय उभारले जाणार असल्‍याची माहिती मिळताच त्‍यासाठी प्रसिद्ध अभिनेता  अजय देवगण यांच्‍या एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेला दिली आहे. यामध्‍ये अजय देवगण यांच्‍यासह  बोनी कपूर, समीर नायर,  रजनिश खानुजा,  दीपक धर,  तरुण राठी,  अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित या सर्वांनी देखील वाटा उचलला आहे.

      या कोविड रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी माहिम येथील पी. डी. हिंदुजा रुग्‍णालयाने महानगरपालिका प्रशासनाला लेखी होकार कळवला आहे. त्‍यामुळे सदर कोविड एचडीयू रुग्‍णालय हे हिंदुजा रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारित विभागाच्‍या स्‍वरुपात कार्यान्‍व‍ित होणार आहे. महानगरपालिकेच्‍या सभागृह नेता  वि‍शाखा राऊत, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) संजीव जयस्‍वाल यांनी आज या विस्‍तारित रुग्‍णालयास भेट देऊन तेथील व्‍यवस्‍थेची पाहणी केली. ही सुविधा लवकरात लवकर कार्यान्‍वि‍त करण्‍याचे निर्देश जयस्‍वाल यांनी यावेळी दिले. या पाहणीप्रसंगी उपआयुक्‍त (परिमंडळ २)  विजय बालमवार, जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त  किरण दिघावकर तसेच हिंदुजा रुग्‍णालयाचे वरिष्‍ठ  जॉय चक्रवर्ती, जी/उत्‍तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्‍य)  वीरेंद्र मोहिते हे उपस्थित होते.

     सदर रुग्‍णालयासाठी संयंत्र, ऑक्सिजन पुरवठा, पाणी, वीज, सुरक्षा इत्‍यादी व्‍यवस्‍था महानगरपालिका पुरवणार आहे. तर हिंदुजा रुग्‍णालयाकडून  वैद्यकीय तज्‍ज्ञ, परिचारिका, इतर मनुष्‍यबळ तसेच रुग्‍णांसाठी कपडे, अन्‍न, औषधी इत्‍यादी बाबी द‍िल्‍या जाणार आहेत. बृहन्‍मुंबई महानगरपालिका व हिंदुजा रुग्‍णालय यांच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नांनी व समन्‍वयाने या ठ‍िकाणी कोविड रुग्‍णांवर उपचार केले जाणार आहेत.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८