संस्थेचे कोणते अभिलेख(Record) दप्तर सुपूर्द करणे आवश्यक

                  भाग २१

ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे

दर आठवडयाला, दर सोमवारी...

अनेकदा सहकार संस्थेत मोठ्या प्रमाणात असहकार दिसून येतो. सदस्य संस्थेत काम करण्यास इच्छुक नसतात. संस्थेचे काम करणे हे त्यांना लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखे वाटते. कारण काहींना पुरर्वानुभव वाईट आलेला असतो. तर कधी वेळेची कमतरता तर कधी मला काही माहित नाही तर कशाला जबाबदारी घ्या? संस्थेच्या कार्यकारणीत काम करणे म्हणजे जमा झालेले पैसे बरोबर खर्च होत आहेत की नाही हे पाहणे, ते नेहमी जागरूक राहून पाहणे गरजेचे असते. पाण्यात उडी मारल्याने तसेच चुका करून शिकता येते आणि मदत लागलीच तर आम्ही आहोतच मदतीला. 

प्रश्न क्र. ९६) हंगामी समितीने कोणाला प्रभार सुपूर्द करावा ?

उत्तर: हंगामी समितीचा अगर नामनिर्देशित समितीचा अध्यक्ष हा नवीन समिती निवडून आल्यावर तिच्या पहिल्या सभेच्या वेळी त्यांच्याकडे असलेली संस्थेची सर्व मालमत्ता व कागदपत्रांचा ताबा स्वतःजवळ काहीही न ठेवता, नव्याने निवडून आलेल्या समितीच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करावा

प्रश्न क्र. ९७) हंगामी समितीच्या पहिल्या सभेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक न झाल्यास संस्थेचा मुख्य प्रवर्तक संस्थेचा अभिलेख कोणाला सुपूर्द करील ?   

उत्तर:  नोंदणी प्राधिकाऱ्याने त्याचे नामनिर्देशन केल्यानंतर संस्थेचा मुख्य प्रवर्तक संस्थेचा अभिलेख संस्थेच्या अध्यक्षांकडे किंवा प्राधिकृत केलेल्या तिच्या कोणत्याही सदस्याकडे सुपूर्द करील.

प्रश्न क्र. ९८) हंगामी समितीचे अधिकार व कर्तव्य काय असतात ?

उत्तर:  हंगामी समितीचे अधिकार व कर्तव्ये ही संस्थेच्या उपविधीनुसार रीतसर निवडून दिलेल्या समिती सारखीच असतात.

प्रश्न क्र. ९९) हंगामी समितीचा पदावधि किती वर्षाचा असतो ?

उत्तर:  हंगामी समिती एक वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार घेण्यात येणाऱ्या नियमित निवडणुकांपर्यंत अधिकारावर राहील.

प्रश्न क्र. १००) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने कोणते अभिलेख दप्तर नवीन अध्यक्षाकडे सुपूर्द करावेत ?

उत्तर: पुढील अभिलेख मुख्य प्रवर्तकाने (चीफ प्रमोटर) नवीन अध्यक्षाकडे सुपूर्द करावेत:-

1) संस्थेचा सर्व अभिलेख व विशेषकरून नोंदणी प्राधिकाऱ्याकडून परत मिळालेली संस्थेच्या नोंदणी अर्जाची प्रत.

2) नोंदणी प्राधिकाऱ्याने नोंदणी केलेल्या संस्थेच्या उपविधीची प्रत.

3) संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.

4) बँकेत भरणा केलेल्या रकमांचे चलान.

      5)    वापरलेल्या धनादेशाच्या (चेकच्या) स्थळप्रती व न वापरलेल्या धनादेशांचे (चेक्सचे) कोरे नमुने.

6) बँकेची पासबुक.

7) त्याने वेगवेगळ्या पक्षकारांशी केलेल्या करारनामांच्या प्रती.

8) त्याने तयार केलेली लेख्यांची विवरणे.

9) सदस्यत्वाचे अर्ज.

10) प्रवर्तकाची माहिती देणारे विवरणपत्र.

11) खर्च केलेल्या रकमांची प्रमाणके. (व्हाउचर्स)

12) काही शिल्लक असल्यास ती रक्कम.

13) जागेचा आराखडा/बांधकाम योजना.

14) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त.

15) नोंदणी प्राधिकाऱ्याशी, स्थानिक प्राधिकरणाशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फाईल्स व

16) त्याच्या ताब्यात असलेली स्वतःजवळ काहीही न ठेवता अन्य सर्व कागदपत्रे व संस्थेची मालमत्ता

17) सुपूर्द अहवालाचा दस्तऐवज तयार करणे.


मागील लेखाबाबत माहिती अथवा सशुल्क मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच सदर लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रीया 

vishal@vlawsolutions.com 

वर नक्की पाठवा.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८