२३ व्या पदवीदान समारंभात राज्यपालांनी व्यक्त केली अपेक्षा
मुंबई प्रतिनिधी : गुरु गोविंदसिंह यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले नांदेड एक प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. नांदेडला देशात महत्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे तेथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (स्वरातीम) विद्यापीठाने देखील प्रयत्नपूर्वक देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करावे व ऑक्सफर्ड प्रमाणे नांदेडला गुणवत्तेचे सर्वोत्तम केंद्र करावे अशी सूचनावजा अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून संबोधन करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते. दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, स्वरातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन व विद्यापीठाच्या विविध प्राधिकृत मंडळांचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.
दीक्षांत समारोहास उपस्थित सर्व स्नातक, पीएच.डी. प्राप्त उमेदवार तसेच सुवर्ण पदक विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सध्याचे युग आंतरशाखीय अध्ययनाचे आहे. अशावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी संघ भावनेने तसेच परस्पर सहकार्याने काम केल्यास सफलता निश्चितपणे प्राप्त होईल. स्नातकांनी पदवी प्राप्त करून अल्पसंतुष्ट न राहता आपले शिक्षण सातत्याने सुरु ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता असून ते समाजाला, देशाला तसेच मानवतेला मोठे योगदान देऊ शकतात याचेही कोश्यारी यांनी स्मरण दिले.समाज आपल्याला नेहमीच देत असतो; आपण समाजाला अधिकाधिक कसे देऊ शकतो याचा विद्यार्थ्यांनी विचार केल्यास विद्यापीठ देशात आदर्श निर्माण करू शकेल असे त्यांनी सांगितले.
माशेलकर टास्क फोर्सचा अहवाल दोन महिन्यात : उदय सामंत
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात कसे राबविता येईल याचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला टास्क फोर्स येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. स्वरातीम विद्यापीठाने मलेशियातील शिक्षण संस्थेशी सहकार्य केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे असे सामंत यांनी सांगितले. स्वरातीम देशातील सर्वोत्तम शैक्षणिक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. कुलगुरू उद्धव भोसले यांनी यावेळी विद्यापीठ अहवाल वाचन केले तर टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ एस रामकृष्णन यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहात २२२८५ स्नातकांना पदव्या तर २१५ उमेदवारांना पीएच डी प्रदान करण्यात आल्या.