मास्क परिधान न केलेल्या नागरिकांकडून १,३०,००० रू दंड वसूल

काल दिवसभरात विविध प्रभाग क्षेत्रात केलेल्या कारवाईत मास्क परिधान न केलेल्या नागरिकांकडून रु. 1,30,000/- दंड वसूल! विनाकारण फिरणाऱ्या 264 नागरिकांच्या अँन्टीजन टेस्ट आणि 15 दुकाने  सील !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण-डोंबिवली  महापालिका क्षेत्रात  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येत्या 15 दिवसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणेबाबत तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँन्टीजन टेस्ट करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने काल पूर्ण दिवसभरात महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने  महापालिका परिसरात विनामास्क फिरणाऱ्या  नागरिकांकडून तब्बल रु.1,30,000 /-इतका दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे काल दिवसभरात सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या 264 नागरिकांची* अँन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्यात सापडलेल्या  एका पॉझिटिव्ह रुग्णास  महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

       नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काल महापालिका क्षेत्रात एकूण 15 दुकाने सीलबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून रु. 35,000/- इतक्या दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी शक्यतोवर कामाशिवाय बाहेर फिरू नये,बाहेर सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना न चुकता मास्क परिधान करावा आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८