कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
कलानगर उड्डाणपुलाविषयी…
कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा-वरळी सागरी मार्ग / एस. व्ही मार्ग, सायन/ धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे. या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली बांद्रा-वरळी सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे. या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा-वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आज दि. २८ जून २०२१ रोजी बांद्रा-वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.