सहयोगी सभासद

             भाग २९

दर आठवडयाला, दर सोमवारी...

     गुगल आपल्याला असंख्य माहिती पुरवतो. परंतु अचूक माहिती हवी असल्यास वाचनाची सवय असायलाच हवी आणि कायद्यात एकदा वाचले म्हणजे सर्व समजले असे नाही. तर अपडेट राहणे हे आवश्यक असते. काल एका संस्थेत मला संस्थेच्या पदाधिकार्यांनी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी बोलावले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, दोन व्यक्तीनी मिळून जर सदनिका विकत घेतली असेल तरी दुसरे नाव करारात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी  सहयोगी सदस्यचा फॉर्म संस्थेत सादर करावाच लागेल.

  तुम्हीसुद्धा वरील समितीच्या पदाधीकार्याबरोबर सहमत आहात का? तुम्हाला कधी काय बदल झाले याची माहिती सदर लेखात खास आपल्यासाठी दिली आहे. वरील स्पष्टीकरणावरून त्यांचा प्रश्न हा सहयोगी सभासद नसून, सह सदस्य बाबत आहे. 

सहयोगी सभासद याच्या व्याख्येत अनेकदा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये खालील प्रमाणे बदल झाले. 

२०१३ सुधारणे आधी 

  ज्या सभासदाने इतर सभासदाबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण केला असेल पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रात प्रथमतः येत नसेल असा सभासद.

२०१३ सुधारणे नंतर 

    जो सदस्य इतर सदस्यांबरोबर व्यक्तिशः किंवा संयुक्तपणे मालमत्तेमध्ये हक्क, मालकीहक्क व हितसंबंध धारण करतो पण ज्याचे नाव भागप्रमाणपत्रात प्रथम स्थानी येत नसेल असा सदस्य, असा आहे.

२०१९ सुधारणे नंतर 

 एखाद्या सदस्याच्या लेखी शिफारशीवरून त्याच्या लेखी पूर्व संमतीने त्याच्या हक्क व कर्तव्य यांचा वापर करण्यासाठी, जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यकुलात यथोचितरित्या दाखल करून घेतलेले असेल आणि भाग पत्रामध्ये जिचे नाव प्रथम स्थानी नसेल अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे पती, पत्नी, माता, पिता, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, जावई, सून, पुतण्या, पुतणी असा आहे.

  २०१९ च्या सुधारणे नंतर सदर अधिनियमात नवीन प्रकरण (सहकारी गृहनिर्माण संस्था) समाविष्ट करण्यात आला त्यात “सह सदस्य”ची व्याख्या खालील प्रमाणे आहे.

  एखाद्या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झालेली असेल अशा त्या गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी अर्जात नाव अंतर्भूत असणारी व्यक्ती, किंवा गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीनंतर जिला तिच्या सदस्यकुलात सदस्यत्वासाठी यथोचितरित्या दाखल करून घेण्यात आले असेल आणि जी सदनिकेमध्ये हिस्सा, हक्क, मालकीहक्क आणि हितसंबंध धारण करीत असेल परंतु भागपत्रात जिचे नाव प्रथम स्थानी नसेल अशी व्यक्ती सह सदस्य (Joint Owner) असते.

सहयोगी सदस्यास, एखाद्या सदस्याच्या लेखी पूर्व संमतीने मतदान करण्याचा हक्क असतो. 

    सह सदस्याच्या बाबतीत जिचे नाव भाग प्रमाणपत्रामध्ये प्रथम स्थानी असेल अशा व्यक्तीला मतदानाचा हक्क असेल. तिच्या अनुपस्थितीत, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीस मतदानाचा हक्क असतो. वरील सुधारणेनुसार ज्या संस्थेतील सदस्यांनी मला बोलावले होते यांनी त्यांच्या संस्थेची उपविधीची प्रत माझ्या समोर ठेवली. तेव्हा सदर उपविधीत सुधारणा वरील प्रमाणे केल्या गेल्या नव्हत्या. 

   परंतु संस्थेचे उपविधी हे नेहमी अधिनियम, नियम, परिपत्रक, सूचना (Notification), ऑर्डर, यांना पूरक असाव्यात, विसंगत नसाव्यात. 

वरील प्रश्नांचे उत्तर आपणास आता समजलेच असेल. 

       यावरून सर्व सदस्यांनी आपले संस्थेचे उपविधी सुधारित आहेत का? हे तपासावे. नसल्यास लवकरात लवकर योग्य ते बदल करावेत. अन्यथा उपविधीच चुकीचे असतील तर त्याला अनुसरून केलेले कामही चुकीचे. यावरून काही सदस्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मागील लेख वाचण्यासाठी “व्ही लॉ सोल्युशन्स” या फेसबुक पेजच्या खाली दिलेल्या लिंक वर जाऊन  लाईक

आणि फॉलो करा. https://www.facebook.com/vlawsolutions/

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८