औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा - गुलाबराव पाटील
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचा आढावा मंत्री पाटील यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते . या योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने जमिनीखालून जी पाईप लाईन गेली आहे तिचा नकाशा कळण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात यावी असे निर्देशही पाटील यांनी दिले.
वाढीव न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा - 3 चा आढावा
रायगड जिल्ह्यातील वाढीव न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा - 3 या योजनेच्या कामाचा आढावाही पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,एमएमआरडीए व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अस्तित्वात येत आहे.या योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देश यावेळी मंत्रिमहोदयांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह औरंगाबाद व पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.