गृहनिर्माण संस्थाचे अध्यक्ष यांचे संस्थेतील कार्य,अधिकार आणि जबाबदाऱ्या

                भाग ३१
दर आठवड्याला, दर सोमवारी...

 संस्थेतील पदाधिकारी हे अनेकदा स्व:ताहून संस्थेचे काम करण्यास पुढे आलेले नसतात. संस्थेचे काम करण्यास सभासद हे उत्साही नसतात. सभासद दुसऱ्यावर आरोप करण्यास नेहमी तत्पर. अनेकदा सदस्याचे म्हणणे असते की, काय काम असते हेच माहित नाही, कोणी सांगितले आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जायचे आणि स्व:ताचे हसे करून घ्यायचे. पदाधिकारी यांची संस्थेतील कार्य, अधिकार आणि जबाबदारी आपल्यासाठी लेखातून देणार आहे. आजच्या लेखात अध्यक्ष याबाबत माहिती आपल्यासाठी उपयोगी असू शकते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड दर पाच वर्षाने होते. सभासदामधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यामधून एका संचालकाची निवड अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेत करण्यात येते. अध्यक्ष हा संस्थेच्या सर्व साधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो व तो  नेहमी संचालक मंडळाला जबाबदार असतो.

गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांची कार्ये:

१. दैनंदिन कामकाज यांवर देखरेख व नियंत्रण ठेवून संस्थेचे कामकाज सहकार कायदा व उपविधी प्रमाणे चालवणे.

२. संस्थेचा कारभार प्रामाणिकपणे चालविण्यासाठी कर्मचारी व अधिकारी वर्गास त्यांची कामे योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे.

३. सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने सभासद, संचालक, तसेच नोकरवर्ग यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण करणे.

४. संस्थेचे कामकाज पारदर्शक ठेवून निर्णय घेताना हितसंबंधांचे रक्षण करणे.

५. सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाची वार्षिक, विशेष सभा आयोजन करण्यापूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका संस्थेच्या सचिवाच्या मदतीने तयार करून त्याच्या प्रती सदस्यांना योग्य मुदतीत पाठविण्याची व्यवस्था करणे.

६. संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेची सूत्रे स्वीकारून सभांचे संचालन सभेच्या नियमानुसार करावे. सभेमध्ये मांडलेले प्रस्ताव, केलेल्या दुरुस्त्या व संमत केलेले ठराव हे कायदेशीर कामकाजात असल्याची दक्षता घेणे. तसेच सभा नि:पक्षपातीपणे चालविणे. 

गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांचे अधिकार

१. दैनंदिन कामकाजाबाबत संस्थेच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवून त्याच्या कार्यपुर्ततेचा अहवाल मागविणे.

२. संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या धनादेशावर, कागदपत्रांवर, करार, इत्यादी कागदपत्रांवर सह्या करणे.

३. संस्थांचे हिशेब पुस्तके व इतरनोंदीवरबारीक लक्ष ठेवून ती तपासणीसाठी मागणे. 

४. संस्थेने दिलेले आदेश न पाळणाऱ्या अधिकारी तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणे.

५. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सभांचे आयोजन करणे व प्रत्येक सभेचे अध्यक्ष स्थान भूषविणे, सभेतील अनावश्यक चर्चा थाबविणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे.

६. सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना अपवादात्मक परिस्थितीत निर्णायक मत देण्याचा निर्णायक मत देणे हे मत जास्तीचे क्निवा अतिरिक्त असे मत जे अध्यक्ष विशेषमत म्हणून वापरू शकतात. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मत पडतात त्य वेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो.  

७. सभा संपल्यानंतर संस्थेच्या सचिवाने तयार केलेल्या सभेच्या इतिवृत्तावर सही करणे.

गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या

१. व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाजाबाबत निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करणे.

२. काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात. अशा निर्णयांना कार्योत्तर मान्यता देणे.

३. कार्यालयीन कामकाज करताना सभासद, संचालकमंडळ तसेच कर्मचारी वर्ग यामध्ये समन्वय व सुसंवाद साधणे.

४. प्रत्येक सभेचे अध्यक्ष स्थान भूषवून सभाचे कामकाज सहकार कायदा, उपविधीतसेच नियम याप्रमाणे सुरळीत व शांतपणे चालविणेतसेच सभेमध्ये आपलीमते मांडण्याची सदस्यांना पुरेशी संधी देऊन सभेचे कामकाज नि:पक्षपातीपणे चालविणे.

५. सहकारी संस्थेचा कार्यालयीन प्रमुख या नात्याने संस्थेच्या महत्वाच्या कागदपत्रावर,दस्तऐवजांवर तसेच करार इत्यादीवर संस्थेच्या वतीने सह्या करणे.

मागील लेख वाचण्यासाठी “व्ही लॉ सोल्युशन्स” या फेसबुक पेजच्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लाइकआणि फॉलो करा.

https://www.facebook.com/vlawsolutions/

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८