मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद होवून मुंबईतील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बाधित पाणी उकळून नंतर पिण्याचे आवाहन
भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपायुक्त अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडुप संकुलात उपस्थित आहेत. संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.